Saturday 10 December 2011

स्वगत संवाद - २०

थोरला भाऊ

दादा माझ्यापेक्षा एका दशकानं वडील आहे. साहजिकच मी जेव्हा ९/१० वर्षांचा म्हणजे खऱ्या अर्थाने कळता होऊ लागलो, तेव्हा तो १९/२० च्या ऐन तारुण्यात पदार्पण करीत होता. तेव्हाचं त्याचं समग्र व्यक्तिमत्त्व सर्वार्थानं ‘नायक’ या संज्ञेला अनुरूप होतं. साहजिकच माझा पहिला आयडॉल पुढे कितीतरी र्वष तोच होता. छान उंची, पोलादाच्या कांबीसारखी कमनीय आणि लवचिक चपळ शरीरयष्टी, दाट कुरळे केस, रेखीव नाक-डोळे आणि आतील मृदू, संवेदनशील सुस्वभाव बिंबित करणारी तरतरीत प्रसन्न मुद्रा अशी रूपसंपदा त्याला लाभली होती. पण या सर्वापलीकडे हे बाह्य़रूपही कमी भासावं अशी गुणसंपदाही त्याच्याकडे होती.. तो सुंदर गायचा, सुरेख पेंटिंग करायचा, गणपतीच्या मूर्ती घडवायचा, भोवतालच्या खेडय़ातील जत्रांच्या फडात कुस्ती खेळायचा. पुढे एस.पी.त शिकताना एका वर्षी तो आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत बॉक्सिंग चॅम्पियनही होता. याच ओघात सांगावंसं वाटतं, की आमच्या दोघांच्या मधली बहीण हेमाताई हीदेखील  सर्वार्थानं त्याची बहीण शोभावी अशी होती. एस.पी.कॉलेजच्या स्नेहसंमेलनात जेव्हा श्रीकांत मोघे पु.लं.च्या ‘अंमलदार’चा नायक सर्जेराव म्हणून प्रचंड गाजले, त्याचवर्षी मुलींच्या ‘खडाष्टक’ नाटकाची नायिका हेमाताई होती आणि तिच्याबरोबर नायक कविश्वरच्या भूमिकेत होत्या, सरोजिनी वैद्य . तेव्हा सहज घडलेल्या या गोष्टी, पण पुढे आज इतक्या वर्षांनी त्या तपशिलात किती खुमारी निर्माण होते! पुढे हेमाताई आम्हा दोघांप्रमाणे पूर्ण वेळ कलाकार होऊ शकली नाही. पण तरीही तीही एक समृद्ध आयुष्य जगतेय. ‘उत्तम गुणाची मंडळी’ हे तिचं एकमेव पुस्तकही त्याची साक्ष देईल.
 
दादाचे हे सर्व गुण मानूनही तो जन्मजात अभिनेताच आहे, ही खूणगाठ मी माझ्या मनानं त्या बालपणीही स्वत:शी नकळत बांधून टाकली होती. पुढे ती सर्वार्थानं सिद्ध झाली. १९६० च्या दशकात आधुनिक मराठी रंगभूमीचं नवं व्यावसायिक पर्व सुरू झालं त्यातील आघाडीच्या पहिल्या फळीत श्रीकांत मोघे हे नाव एका स्व-अधिकारानं नोंदलं गेलं आहे. तिथपासून पुढची उणीपुरी ४०-५० र्वष ते नाव रंगभूमी, चित्रपट आणि दूरदर्शन या सर्व माध्यमांतून अखंड प्रकाशत राहिलं आहे. पण या प्रकाशझोतात येण्यापूर्वीचा धूसर प्रकाशातील त्याचा प्रवास एक अभ्यासू रसिक आणि धाकटा भाऊ या नात्याने मी खूप जवळून पहिला आणि अनुभवला हे मला नि:संशय माझं भाग्य वाटतं. चित्रपटाच्या भाषेत ज्याला ‘वन लाइन’ म्हणतात, तसा तो आधीचा प्रवास या क्षणी माझ्या डोळ्यांपुढे सरकतोय.
 
वयाच्या अवघ्या सातव्या-आठव्या वर्षी तो किलरेस्करवाडीच्या रंगभूमीवर पोवाडा म्हणायला उभा राहिला. एखाद्या अभिनेत्याला डोळ्यांपुढे ठेवून एखाद्या नाटककाराने नाटक लिहिणं ही अपूर्वाई असेल, तर पुढे  वसंत कानेटकरलिखित ‘लेकुरे उदंड झाली’ सारखं झळझळीत उदाहरण आहेच. ..पण तेच भाग्य या कलाकाराला अगदी बाळपणीही मिळालं, ही वस्तुस्थिती आहे. किलरेस्कर मासिकांचे सह-संपादक आणि दाजीकत्रे ना. धों. ताम्हनकर यांनी बालपणीच या चुणचुणीत मुलासाठी एक नाटक लिहिलं- पारितोषिक. त्या नाटकाच्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरचं ते छायाचित्र आजही पाहण्यासारखं आहे.
 
सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजच्या पहिल्या वर्षीच योगायोगाने त्याची भेट पु. ल देशपांडे आणि सुनीताबाईंशी झाली. भविष्यातील एका प्रदीर्घ ऋणानुबंधाचा तो शुभारंभ होता. त्याच कॉलेजात त्यानं ‘लग्नाची बेडी’तला अवधूत झकास रंगवला. पुढच्या वर्षी पुण्याच्या एस.पी. कॉलेजात त्याचा ‘अंमलदार’ मधला सर्जेराव गाजला. इतका की, खुद्द पु.लं.नी स्वत:च्या गरहजेरीत त्याच्या नावाची शिफारस केली.
 
पुण्याची नामवंत नाटय़संस्था महाराष्ट्रीय कलोपासकने सादर केलेल्या मामा वरेरकरलिखित ‘अपूर्व बंगाल’ मध्ये त्यानं राखालची भूमिका केली आणि त्या वर्षीचं उत्तम अभिनेत्याचं राज्य पारितोषिक मिळवलं. त्याचवर्षी ते पारितोषिक मिळवणारी दुसरी दोन नावं होती- डॉ. श्रीराम लागू आणि विजया जयवंत. या सुमारालाच चित्रपटाचीही वाट उजळू पाहत होती. राजा परांजपे आणि ग. दि .माडगूळकर यांना त्याचं कौतुक होतं. एकीकडे व्ही. शांताराम यांच्या शाहीर प्रभाकरसाठी बोलावणं आलं होतं. पण मनाचे कौल काही वेगळे होते. म्हणून १९५७ साली तो थेट दिल्लीला गेला. दिल्लीतली चार-साडेचार र्वष खूप महत्त्वाची होती. त्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाला वेगळी झळाळी देणारी. दिल्लीमध्ये एकीकडे तो रेडिओवरून रोज रात्री आठ वाजता बातम्या देत आम्हाला आणि सर्व मराठी श्रोत्यांना भेटत होता आणि दुसरीकडे दिल्लीच्या मराठी आणिहिंदी रंगभूमीवर गाजत होता. तिथं ‘तुझे आहे तुजपाशी’त तो श्याम झाला, कारण तेव्हा तो आपादमस्तक श्यामच होता. ‘और भगवान देखता रहा’ या वरेरकर लिखित हिंदी नाटकात भोवतालच्या पंजाबी-उत्तर हिंदुस्थानी कळपात हा मराठा गडी हीरो झाला आणि यशाचा धनी ठरला. कर्नल हेमचंद्र गुप्ते दिग्दर्शक होते आणि त्या नाटय़प्रयोगाला पंतप्रधान पं. नेहरू, राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद आदींची उपस्थिती होती. देव आनंदच्या भगिनी श्रीमती कपूर (शेखर कपूरच्या मातोश्री) यांच्या इंग्रजी नाटकाचेही दौरे त्या काळात त्यानं केले. म्हणजे एकाच वेळी तो मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीनही मंचांवर वावरत होता.  पुढे एकदा प्रख्यात दिग्दर्शक राम गबाले मला सहज बोलताना म्हणाले होते, ‘अरे श्रीकांतचा त्या वेळी दिल्लीत काय आब होता, मी स्वत: पाहिलाय ना,’ याच सुमारास दिल्लीकर झालेल्या पु. ल. देशपांडेंनी त्याला आपल्या ‘कृष्णाकाठी कुंडल’मध्ये सहभागी करून घेतलं आणि भविष्यकालीन एका दिग्विजयी यशाची पेरणी केली.
 
१९६१ साली दिल्ली सोडून तो पुन्हा मुंबईत परतला तो पूर्ण वेळ कलाकार होण्याचा निर्णय घेऊनच. आवड होती म्हणून एकीकडे जे. जे. कॉलेजमध्ये वास्तुरचनेच्या अभ्यासक्रमाला आरंभ केला आणि दुसरीकडे पूर्णवेळ अभिनेता. त्याचवेळी ‘प्रपंच’ चित्रपट मिळाला आणि तीही वाट खुली  झाली. पाठोपाठ ‘वाऱ्यावरची वरात’ थाटामाटात आली आणि जणू भाग्योदयच झाला. तिथून त्यानं मागं वळून पाहिलंच नाही, ते आजमितीपर्यंत. अगदी थेट आजही नव्या नाटय़संपदेच्या नव्या नवलाईच्या वाऱ्यावरच्या वरातीचा दिग्दर्शक म्हणून तो जोमाने लढतोच आहे.
 
एकतर कीर्तनकार वडिलांचा फार संपन्न वारसा आम्हा सर्वच भावंडांना मिळाला आहे, पण तो केवळ आनुवंशिकतेचा भाग म्हणून नव्हे. अत्यंत सजग डोळस संस्कार जाणीवपूर्वक करणे आणि घेणे या एका अखंड प्रक्रियेचं ते फलित आहे. दादावरचे ते संस्कार त्याच्यामधील अभिनेत्यात थेट प्रतिबिंबित झालेले दिसतात. कुशाग्र बुद्धी, विस्मयजनक स्मरणशक्ती, सुस्पष्ट रसाळ वाणी, बहुश्रुतता आणि अजोड बहुरूपीपण ही त्याची बलस्थानं आहेत. नटवर्य नानासाहेब फाटक यांनी रवीद्र पिंगे यांना दिलेल्या एका मुलाखतीत दादाचा उल्लेख या पिढीतील सर्वागसुंदर नट म्हणून सर्व गुण-विशेषांसह केला आहे.
 
सुमारे दोन अडीच तपांच्या त्याच्या कारकीर्दीत त्यानं केलेल्या नानाविध भूमिकांतील काही मोजक्याच भूमिकांचा केवळ धावता मागोवा घेतला, तरी त्यातील आवाका पाहून मन अचंबित होईल. ‘तुझे आहे तुजपाशी’त सुसंस्कृत डॉ. सतीश, ‘सीमेवरून परत जा’मधील जगज्जेता सिकंदर, ‘बिकट वाट वहिवाट’मधला भाबडा रांगडा नाना गवळी, ‘लेकुरे’मधला दिमाखदार राजशेखर, ‘मृत्युंजय’मधला तामसी दुर्योधन, ‘गरुडझेप’ किंवा हिंदी ‘शेर शिवाजी’मधील धीरोदात्त शिवाजी राजे, ‘अश्वमेध’मधला आदर्शवादी प्रोफेसर, ‘संकेत मीलना’तला जगावेगळा प्रियकर. ‘वराती’तला कडवेकर , चा चा चा करणारा गावठी हीरो आणि ‘स्वामी’तला लाजवाब रसरशीत राघो भरारी पेशवे..  या सगळ्यांचा परामर्श हा एक स्वतंत्र पुस्तकाचा विषय होईल.
एक धाकटा भाऊ म्हणून दादाविषयी मला काय वाटतं हे शब्दात सांगणं अवघड आहे. ‘हातसे छूकें इसे रिश्तों का इल्जाम न दो’ असं त्या भावनेबाबतीत म्हणावंसं वाटतं. ‘हीरो वरशिप’ (Hero worship) ते कठोर टीकाकार या सगळ्या भूमिकांतून मी त्याच्याशी जोडलेलो आहे. इतकंच नाही तर माझ्या वाटचालीतही त्याचा अखंड आधार मला मिळत राहिला आहे, हेही माझं भाग्यच. त्याचा प्रवास जवळून पाहताना मला माझी क्षितिजं शोधणं अधिक सुकर झालं. आपण सगळेच असंख्य गुणदोषांनी भरलेली माणसं असतो..
 
मग आम्ही दोघे तरी कसे आणि का अपवाद असणार? पण ते मान्य करतानाही दोघांमधील साम्यभेद सांगताना, तो माझ्यापेक्षा अधिक चांगला माणूस आहे, हेच मी पुन्हा पुन्हा म्हणतो. आयुष्यामध्ये मिळणारे लौकिक मानसन्मान हे केवळ सुखद योगायोग असतात. त्यांचा आनंद असतो आणि होतोही. पण हवं ते श्रेय मिळणं, न मिळणं अथवा तथाकथित कल्पनेनुसार उशिरा मिळणे यावर कलाकाराचं मूळ अस्तित्व कधीच आधारलेलं नसतं, ते जे काही मूळ असतं ते सूर्यप्रकाशाइतकं निर्मळ, सतेज आणि नि:संदिग्ध असतं. त्यामुळे अशा सर्व लाभाच्या क्षणीही आमची वृत्ती सहज, सुस्थिर असते. आजच्या आनंदाच्या क्षणीही आमच्या आतली मानसिकता तीच आहे.
 
पण या क्षणी खोल मनात दरवळणारा आनंद वेगळाच आहे. एक माणूस आणि कलावंत म्हणून तुमचा श्रीकांत मोघे आणि आमचा दादा एक खूप समृद्ध प्रदीर्घ आयुष्य जगत आहे. आजही त्याची ती दमदार वाटचाल सुरूच आहे आणि मोघे कुटुंबाच्या कलाकार-धर्माचा वारसा दादा-वहिनीच्या आणि अर्थातच पर्यायाने आमच्याही शंतनूच्या रूपाने पुढची आश्वासक वाटचाल करू लागला आहे, या दोन गोष्टी ही आम्हा जवळच्या सर्वाच्या दृष्टीने खरीखुरी कृतार्थतेची परिसीमा आहे.

Saturday 3 December 2011

स्वगत संवाद - १९

आपण लिहिलेल्या अग्रलेख-संग्रहाला माझी प्रस्तावना घ्यावी असं मुळात वसंत आपटे ह्यांच्या मनांत यावं हया घटनेतील आश्च्यर्यातून खरं तर मी स्वत:चं अजून पुरता बाहेर आलेला नाही. कारण गेली तीस-पस्तीस वर्षं मी ज्या भूमिकातून आणि क्षेत्रातून वावरलो आहे, त्या कशाचाही पत्रकारितेशी दूरांन्वयानंही कुणी संबंध जोडू शकेल असं वाटत नाही. आतून बाहेरून लख्ख कलावंत आणि एरवी हाडांमासाचा पुरेपूर स्खलनशील माणूस एवढीच माझी सर्वज्ञात ओळख असणार... आणि तशी ती असण्याला माझीही कसलीच हरकत असण्याचं कारण नाही...मागे एका स्त्री-वादी दिवाळी अंकात माझी एक बरीच प्रदीर्घ मुलाखत, कलावंत म्हणून नव्हे तर एक निखळ व्यक्ती म्हणून,  घेतली गेली  होती... कला-क्षेत्र पूर्ण वगळून समग्र जीवन संदर्भात प्रश्नाची सरबत्ती झडत होती आणि मीही प्रथमच माझे सुप्त विचार माझ्याही नकळत प्रकट करीत  होतो.. मुलाखत संपताना न राहवून मुलाखतकर्त्या स्त्रियां बोलत्या झाल्या,  तुम्हाला भेटण्यापूर्वी तुम्ही ह्या सर्व गोष्टींचा इतका सविस्तर आणि खोलवर विचार केला असेल असं खरंच वाटलं नव्हतं.. त्यावर मीही माझ्याही नकळत म्हणालो, मला तरी कुठे वाटलं होतं ?  तेव्हां अशा ह्या एकूण पार्श्वभूमीवर आरंभी मी व्यक्त केलेल्या आश्चर्याविषयी कुणाला आश्चर्य वाटायला नको.  पण नंतर  मग माझ्याचं ध्यानांत आलं की त्यांनी माझी निवड एकाच निकषावर केली आहे. ती म्हणजे आमच्या दोघांच्या पायाखालची मूळ जमीन एक आहे.  किंवा दुस-यां  शब्दांत सांगायचं तर आम्ही दोघे एकाच सांस्कृतिक घरांत वाढलो आहोत.. त्या घराचं नांव आहे, किर्लोस्करवाडी.. आणि हा घरचा हक्क ध्यानी आल्यावर तो नाकारण्याचा प्रश्नच उभा रहात नाही  आणि त्यामुळे आमच्यातला तो ऋणानुबंध उकलतच मी हे माझं मनोगत लिहिणार आहे. मला वाटतं, माझ्या ह्या मनोगताची झाली एव्हढी प्रस्तावना पुरेशी व्हावी..  म्हणजे आता प्रस्तावनाकर्तेपणाचं मनावरचं दडपण दूर करून मी आता माझ्या मनालाच बोलतं करत जातो.
 
तसे हे  वसंत आपटे एरवीही  भलतेच चतुर निघाले....मी हा असा अर्जुन-संभ्रम-अवस्थेत असताना त्यांनी माझ्याही ध्यानीमनी नसलेली एक हळूवार नस नेमकी दाबली.  ते म्हणाले,  काही लिहा हो.. अगदी बालपणच्या तुमच्या संपादकपणाबद्दल लिहिलंत तरी चालेल.  मी अंमळ मोहरलोच.  (कवी असूनही माझ्या बाबतीत हे असले योग जरा दुर्मिळच) गोष्ट खरी आहे.. बालपणीचं माझं पहिलं स्वप्न संपादक होण्याचंच होतं. त्या वयात वाचन हया बाबतीत मी जरासा सखाराम गटणे होतो.  पुढ्यात पुस्तक आलं की त्याचा फडशा पाडायचा. ते आपल्याला कळो न कळो ..मग ते  शि.म.परांजपेकृत काळाचे निवडक निबंध असोत की सुधारकमधले गोपाळ गणेश आगरकरलिखित अग्रलेखांचे दहा खंड असोत. ह्या वाचनयज्ञात एकदा द्वा.भ.कर्णिकांचं संपादकाचे जीवनस्वप्न हे नितांत सुंदर पुस्तक आलं  आज इतक्या वर्षानंतरही माझ्या मनावरचा त्याचा प्रभाव ओसरलेला नाही.  तिथून संपादक ह्या भूमिकेची मोहिनी माझ्यावर जी पडली तीही आजतागायत तितकीच खोल आहे.  मग माझे त्यातले बाल-प्रयोग सुरू झाले. हस्तलिखित नियतकालिके काढणे, तत्कालीन मौज, विविधवृत्त, नवयुग (त्यातील दत्तु बांदेकरांचा रविवारचा मोरावळा) ह्याची बालसुलभ नक्कल करीत ती अल्पकाळ चालवणे आणि बंदही पाडणे.  त्यामुळे त्यांची नांवंही बुडबुडा, धूमकेतू अशीच होती.  बालपणातून किंचित कुमार वयात प्रवेश करताना ते पोरखेळ थांबले. पण तरीही  संपादक होण्याचं स्वप्न धुगधुगत होतंच. मग वहीत शाळकरी पोरी जशी त्यांच्या हीरोचं नांव कोरत रहातात, तसा मी कोरीव अक्षरांत लिहीत रहायचो. संपादक : सु.रा.मोघे.. मग  कधी स वर अनुस्वार तर कधी प अक्षराला अर्धा म जोडायचा.
वसंत आपटेच्या त्या अनपेक्षित उद्गारांनी ही सगळी आठवण जागी झाली. मजा वाटली.  पण मग क्षणांत एक नवल मनांत जागं झालं ..आपण फक्त ती बालपणाची हौस केली. पण त्याच भूमीत वाढलेल्या वसंत आपटेनी मात्र खरोखरच त्या आडवळणी भागात हे आपलं जग उभं केलं सातत्यानं चिकाटीनं, निष्ठेनं  चालवलं आणि आज तर त्यांच्या अग्रलेखांचा हा दुसरा (?) संग्रहही  पुस्तकरूपात प्रकाशित होतो आहे.  आमच्या दोघांच्याही पायाखालची ती प्रेरणादायी भूमी अशी  होती तरी काय ? ती महाराष्ट्राच्या नवउद्योगविश्वाची मुहूर्तमेढ होती...पण त्याचबरोबर  किर्लोस्कर-स्त्री-मनोहर ह्या सर्वव्यापी नियतकालिकांची ती जन्मभूमीही होती. योगायोग फार मजेदार असतात.  त्या मासिकांचा जो पहिला निर्मिती परिवार होता त्यामध्ये एका महत्वाच्या जागी वसंत आपटेचे वडील कार्यरत होते.. त्यांचं नाव, गो. नां. आपटे.

गो.नां. आपटे मला अंधुक अंधुक आठवतात. शुभ्र धोतर-शर्ट आणि अर्धवर्तुळाकार मुठीची लाकडी काठी हातात घेउन फिरायला निघालेले.  तशी त्यांनी किर्लोस्करांची नोकरी कधीच सोडली होती आणि त्यामुळे किर्लोस्करवाडीही सोडली होती.  परंतू तो परिसर सोडला नव्हता.  वाडीच्याच कुंपणाबाहेरील तुपेवाडीत (आजचं रामानंदनगर) ते शेती करीत होते..आणि त्या शेतातच झोपडीवजा टुमदार घर बांधून रहात होते. अल्पावधीत तो आपट्याचा मळा म्हणून ओळखला जाउ लागला. आणि वाडीकरांनां जायला एक ठिकाण तयार झालं.  बहुधा काहीतरी मतभेदातूनच त्यांनी वाडी सोडली होती.  पण तरीही त्यांचे आणि किर्लोस्कर मंडळीचे संबध अल्पावधीत  होते तसे जिव्हाळ्याचे झाले .  आणि आपटे कुटुंबीय हे तसे वाडीकरच राहिले ते आजतागायत.

पण माझ्या मनांत गो.ना.आपट्यान्ची प्रतिमा राहिली आहे ती वेगळीच, आमच्या घरातील फोटो आल्बमतील एका ग्रुप फोटोतून.  किर्लोस्करवाडीतील नाटकांची परंपरा फार जुनी आणि वेधक आहे. श्रीकांत मोघे आणि सुधीर मोघेही त्याच नाट्यशाळेतून तयार झालेले गडी आहेत.  ती परंपरा सुरू झाली त्यातील अगदी आरंभकाळातील  महत्वाचं नाटक म्हणजे, तोतयाचे बंड. ते नाटक केवळ इतिहास विषयावरचं होतं म्हणून नव्हे तर गांवाच्या इतिहासातील एक ऐतिहासिक वळण होतं. कारण त्यामध्ये नाना फडणीस ह्या मध्यवर्ती भूमिकेत चक्क शं.वां.किर्लोस्क्रर होते.. त्याशिवाय त्यामध्ये आनंदीबाई विजापुरे, गणपतराव विजापुरे, शांताबाई किर्लोस्कर, रा.ग.मोघे, चित्रकार ग.ना.जाधव (चक्क स्त्रीभूमिकेत) अशी मातबर मंडळी होती. आणि त्यामध्ये ज्या भूमिकेचा नाटकाच्या शीर्षकातच समावेश आहे त्या भाउसाहेब पेशव्यांच्या तोतयाच्या भूमिकेत होते,  गो.ना.आपटे...तो फोटो पहाताना, प्रत्यक्षात तो न पाहिलेला नाट्यप्रयोग माझ्या मनोभूमीवर घडताना पाहणं हा माझा खूप दिवस एक आवडता चाळा होता.  पाहिलंत ? एक साधं मनोगत लिहायच्या निमित्तानं काळाचा केवढा फेरफटका झाला. पण आज हे लिहिण्यामागे किती खोलवर गेलेली मुळं आधारभूत आहेत हेही त्यामुळे कळून येईल.

पण अशी काही प्रदीर्घ पार्श्वभूमी नसती तरी आपलं जग ह्या नियतकालिकाची व्रतस्थ वाटचाल आणि हे सगळे अग्रलेख ह्यांचं मोल कणभरही कमी ठरलं नसतं हेही तितकंच खरं.  जीवनाच्या सर्व अंगाना आणि सर्व क्षेत्रांना स्पर्श करणारे हे लेख खरोखरच वाचनीय आहेत.  त्यामध्ये विवेचन आहे..पण खूप सहज आणि स्वाभाविक. आहे..  त्यामागे कसलाही त्रयस्थ किंवा उच्चासनावरचा अभिनिवेश नाही. तुमच्या आमच्या मनातले घोळणारे विचार  कुणीतरी मुखर करतं आहे अशी एक अनौपचारिकता ह्या सर्व लेखनाला आहे.  आज एकूणच विविध थरावर सर्वत्र तीव्र असमाधान आहे.  पण ते व्यक्त करताना जगण्याची चव जावी अशी कडवट निराशावादी भूमिका कणभरही वरचढ होताना ह्या लेखनात दिसत नाही.

परवाच मी माझ्या ब्लॉगवरील स्वगत संवादात आस्तिक आणि नास्तिक ह्या शब्द-संकल्पनांचे  मला अभिप्रेत असलेले अर्थ लिहिले आहेत. मी ते पोझिटिव्ह आणि निगेटिव्ह ह्या अर्थाचे मराठी पर्याय म्हणून पहातो.   त्या दृष्टीनं ह्या सर्व लेख्नामागे एक सुप्त आस्तिक्यबुद्धी आहे असं मला वाटतं...

आणि म्हणून पुन्हा मूळ पदावर जाण्याचा आरोप गृहीत धरूनही मी हेच म्हणेन की हा वारसा किर्लोस्कर मासिकांचा आहे. औंध संस्थान आणि किर्लोस्करवाडी ह्या जागृत पुण्यभूमीत वास करणा-या अदृश्य मूल्य-तत्वाचा आहे. आणि स्वत: औंधकर महाराज, लक्ष्मणराव किर्लोस्कर, शं.वा.किर्लोस्कर, मुकुंदराव किर्लोस्कर आणि शांताबाई किर्लोस्कर ह्या जागृत साक्षेपी व्यक्तित्वांचाही  आहे.  पण असा वारसा मिळणं हे जितकं भाग्य ..तितकंच तो वारसा सर्वार्थानं निभावून नेण ही एकप्रकारे कसोटीच असते.. गेलेला काळ आणि त्यांत घडलेले इतिहास हे नेहमीचं नंतर रम्य ठरतात ...  पण बदलत्या काळाची परिवर्तनं आणि त्यानी पावलापावलावर पेरलेली आव्हानं हे जितंजागतं वर्तमान हे नेहमीचं अटळ  सत्य असतं.. आपल्या मनानं स्वीकारलेल्या आणि जोपासलेल्या चिरंतन मूल्यांची सांगड घालीत त्या सत्याला सामोरं जात आपली वाट चालणं हाच खरा पुरुषार्थ ठरतो.

त्याचं थेट प्रत्यंतर पाहिजे असेल तर आपलं 'जग'ची वाटचाल जाणुन घ्यावी  आणि 
             हे पुस्तकही पहावं .. 
             तेव्हां , एक सहप्रवासी म्हणून आणि घरचा माणूस म्हणून
             हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छाही.

सुधीर मोघे ..
मंगळवार दिनांक २० सप्टेंबर २०११